मुंबई – गोवा महामार्गावर उद्या अवजड वाहनांना बंदी

| अलिबाग | वार्ताहर |

मुंबई -गोवा महामार्गावर येत्या शनिवारी (दि.12) रोजी खारपाडा ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या संदर्भातील वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 345 वी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन कार्यक्रम 12 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शिवभक्त किल्ले रायगडावर येण्याची शक्यता आहे. वाहनांची वर्दळ वाढल्यास माणगाव, इंदापूर, कोलाड पट्ट्यात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भातील वाहतूक बदल अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवारी जारी करण्यात आली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड-अवजड वाहनांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 12 एप्रिल रोजी मध्यरात्री बारानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत जड-अवजड वाहनास वाहतूक बंदी करण्यात आली आहे. यामधून जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहिका, तसेच महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळण्यात आली आहेत.

Exit mobile version