पूरग्रस्तांना वालावलकर रुग्णालयाचा मदतीचा हात

बाधितांची आरोग्य तपासणी व मोफत उपचार
| खेड । अजित जाधव ।
कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर व आजूबाजूच्या गावामध्ये पुराचे पाणी आल्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती बाधित झाली असून त्यांना सावरण्यासाठी शासन स्तरावर व खाजगी संस्थांमार्फत मदतीचा ओघ सुरू आहे. डेरवण येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजावर ओढवलेल्या संकटामध्ये मदतीचा हात पुढे करत ता. 23 जुलै पासून दररोज सुमारे दोन हजार फूड पाकिटांचे चिपळूण व आजुबाजूच्या खेर्डी, उक्ताड, भुरणेवाडी, सती समर्थनगर, शंकरवाडी आदी विभागामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पूरग्रस्तांसाठी वाटप केले जात आहे. पूर ओसरल्यावर साथीचे आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वालावलकर रूग्णालय डेरवण मार्फत दररोज वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, सामाजिक कार्यकर्ते व रूग्णालयातील इतर कर्मचारी असे तीस जणांचे आरोग्य पथक या प्रभावित भागात आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार करत आहे. तर याठिकाणी डॉक्झिसायक्लिन, पॅरासिटॅमोल, एंटीबायोटिक, मल्टीविटामिन्स, एंटीफंगल ऑइनमेंट, ऑइनमेंट ओंटिमेंट, ओआरएस व इतर औषधांचे वाटप केले जात आहे. चिपळूण शहर व परिसरातील सुमारे दोन हजार एकशे साठ पूरग्रस्तांनी या सेवेचा आत्तापर्यंत लाभ घेतला आहे. संस्थेमार्फत हे कार्य सेवाभावी वृत्तीने करण्यात येत आहे. चिपळूण वासियांनकडून संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वत्र घरे व रस्त्यावर गाळ आणि चिखलाचे ढीग आहेत. त्याच बरोबर पूरानंतरचे मोठे आव्हान या बाधित लोकांना पिण्याचे पाणी, अन्न कपडे आणि वैदयकीय मदत पुरविणे गरजेचे आहे. इतर बचाव दल कार्यरत असले तरी भ.क.ल. वालावलकर रूग्णालयाने सामाजिक बांधिलकी लक्षात घेत समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याचा हा संस्थेचा छोटासा प्रयत्न आहे. अशी प्रतिक्रीया डॉ. सुवर्णा पाटील यांनी दिली.

Exit mobile version