नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अनोखा उपक्रम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
लाचखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोशल मिडीयाचा आधार घेतला आहे. त्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. 9920351064 या क्रमांकाच्या हेल्पलाईनद्वारे लाचखोरांवर नजर राहणार आहे. या हेल्पलाईनच्या क्रमांकाचा उद्घाटन समारंभ ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. लाच घेणाऱ्यांची तक्रार या हेल्पलाईनवर घेतली जाणार आहे.
नवी मुंबईचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या माध्यमातून रायगडसह सिडको, पनवेल अशा अनेक भागात लाच घेणाऱ्यांना दणका दिला आहे. गेल्या काही महिन्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात नऊ आरोपींचा समावेश आहे. सिडको सीबीडी, नैना प्रकल्प, पेण व श्रीवर्धन येथे छापे टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तीन सिडको, एक महसूल आणि एक महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
वाढत्या आधुनिकरणामुळे सोशल मिडीयाचा वापर प्रचंड वाढला आहे. तरुणांसह सर्वच वयोगटातील मंडळी व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आदी सोशल मिडीयाचा वापर करतात. त्यामध्ये व्हॉट्सॲपला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या संकल्पनेतून डिजीटलसह आधुनिकतेचा वापर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी केला. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि पारदर्शक शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विशेष सार्वजनिक हेल्पलाईन सुरू केली आहे. 9020351064 या हेल्पलाईनचा लोकार्पण सोहळा अधीक्षक शिवराज पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपअधीक्षक धर्मराज सोनके, पोलीस निरीक्षक सुधीर निकम, किरणकुमार वाघ, अरुंधती येवळे आदी उपस्थित होते. शासकीय कार्यालय, कंत्राटी प्रक्रीया, सरकारी कामात लाच मागितल्यास, तसेच संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित तक्रार नोंदविण्यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आता हेल्पलाईन लाचखोरांचा कर्दनकाळ ठरणार असून लाच घेणाऱ्यांवर हेल्पलाईनची नजर राहणार आहे.
एसीबीकडून जनतेला आवाहन
परिसरातील नागरिकांनी सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई येथे टोल फ्री क्रमांक 1064, दुरध्वनी क्रमांक 022- 27833344 तसेच व्हॉट्सॅप क्रमांक 9920351064 येथे संपर्क साधावा असे आवाहन उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी केले आहे.
