हेमंत ढोमेच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु; ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गेल्या काही वर्षांत हेमंत ढोमेने अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशी ओळख निर्माण केली आहे. झिम्मा, झिम्मा 2, फसक्लास दाभाडे या चित्रपटांचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. फर्स्टक्लास दाभाडेच्या यशानंतर हेमंत ढोमे व क्षिती जोग पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच त्यांच्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. त्यांच्या क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून संचालक मंडळ नागाव हायस्कूल शाळेत त्याचे चित्रीकरण होणार आहे.
आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत आपल्या शाळेचे मोठे योगदान असते आणि त्यातही मराठी माध्यमाच्या शाळा म्हणजे आपल्या मनावर मायबोलीचे संस्कार करणारे ज्ञानमंदिरच असते. सद्यस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करणाऱ्या क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे नुकताच पार पडला. या चित्रपटाची निर्माती क्षिती जोग आहे. सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी हेमंत ढोमेची आहे.
अलिबाग, मुरुड तालुक्यात होणार चित्रीकरण
या चित्रपटाचे चित्रीकरण अलिबाग, नागाव, चौल-रेवदंडा, मुरुड-जंजिरा या परिसरात होत असल्याचा विशेष आनंद व अभिमान अलिबागकरांनी तसेच आ. अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे व निर्मात्या क्षिती जोग हे नेहमीच समाजाला आरसा दाखवणारे, आशयसंपन्न चित्रपट आपल्यासाठी घेऊन येत असतात. हा नवीन चित्रपटही असाच मनाला स्पर्श करणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल
नवीन चित्रपटाचे फोटो शेअर करताना हेमंत ढोमेने लिहिले, आता मराठी शाळा पुन्हा भरणार. आपल्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. गणपती बाप्पा मोरया! ही पोस्ट शेअर करताना हेमंत ढोमेने क्षिती जोग व चलतचित्र मंडळाला टॅग केले.
आज मी जे काही आहे, ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल. मुहूर्ताला आदिती तटकरे यांसारख्या समाजभान असलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
– हेमंत ढोमे, दिग्दर्शक







