| महाड | प्रतिनिधी |
रोटरी क्लब ऑफ महाड यांच्या चेरी ब्लॉसम प्रोजेक्ट अंतर्गत चांढवे हायस्कूल, चांढवे येथे भव्य हिमोग्लोबिन तपासणी शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात एकूण 160 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या उपक्रमास रोटरी प्रेसिडेंट नॉमिनी रोटे. राजीव वनरसे, माजी अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख रोटे. डॉ. राहुल सुकाळे, तसेच सुकाळे नर्सिंग होमची वैद्यकीय टीम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
शिबिराच्या आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक वन्नेरे, शिक्षकवृंद आणि शाळा प्रशासन यांनी सक्रिय सहकार्य केले. शिबिरादरम्यान रोटे. डॉ. राहुल सुकाळे यांनी विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिनचे महत्त्व, संतुलित आहार, स्वच्छतेची गरज, ॲनिमिया प्रतिबंधाचे उपाय आणि नियमित आरोग्य तपासणी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यजागरूकता वाढली आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
चेरी ब्लॉसम प्रोजेक्टचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यजागृती वाढवणे, ॲनिमिया कमी करणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे हा आहे. रोटरी क्लब ऑफ महाड सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, या प्रकल्पातून अनेक विद्यार्थ्यांना निरोगी व उज्ज्वल भविष्याची दिशा मिळत आहे.
चांढवे हायस्कूलमध्ये हिमोग्लोबिन तपासणी
