हेरंब कुलकर्णी उत्साहाने पुन्हा शाळेत रुजू

| मुंबई | प्रतिनिधी |
मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन कुलकर्णी पुन्हा एकदा उत्साहाने शाळेत कामावर रुजु झाले आहेत. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. माझ्यावर हल्ला झाल्यावर पुन्हा नव्या उत्साहाने मुख्याध्यापक म्हणून कार्यालयात आलो, असे ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

खूप कमी कालावधीत हेरंब कुलकर्णी पुन्हा कामावर रुजु झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या जिद्दीला सलाम केला आहे. हेरंब कुलकर्णी फेसबुक पोस्टमध्ये म्हणालेत की, ‘मी अजून जहाज सोडलेले नाही. साने गुरुजी-सावित्रीबाईंची प्रेरणा पाठीशी आहे.’ हेरंब कुलकर्णी यांनी अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य देखील कोट केलं आहे. ‘गुंडांना घाबरत जाऊ नये, त्यांना नमवणे सर्वात सोपे असते’, असं ते वाक्य आहे.

हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली होती. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला होता. कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांचे सहकारी गाडीवर जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी गाडीवरुन त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर गाडी समोर लावून त्यांना मारहाण केली. काहीच न बोलता अज्ञातांनी मारहाण केली होती.अनोळखी व्यक्तींनी हातात रॉड घेऊन मारहाण केली. त्यानंतर ते तेथून पळून गेले. कुलकर्णी यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याने हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर 4 टाके पडले होते.

Exit mobile version