। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल जवळील अजिवली हद्दीतील नवकार लॉजिस्टिकमधून परदेशातुन अवैधरित्या आयात केलेले 362.59 कोटी रुपयांचे हेरॉईन नामक अंमलीपदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. हा राज्यातील सर्वांत मोठा साठा असून नवी मुंबई पोलिसांनी तो हस्तगत केल्याचे समजते. गुन्हे शाखा, नवी मुंबई येथे पंजाब पोलीसांच्या स्पेशल ऑपरेशन सेलकडुन पोलीस आयुक्तालय हद्दीतील न्हावाशेवा पोर्ट, नवी मुंबई येथे दुबई येथून कंटेनरमध्ये अंमली पदार्थ दडवून दि.15/12/2021 रोजी भारतात आणल्याची व कंटेनरमधील माल घेण्यासाठी अद्यापही कोणी आले नसल्याची माहीती पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा यांना मिळाली होती.
प्राप्त झालेल्या माहितीची पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी गंभीर दखल घेवुन पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, नवी मुंबईच्या पोलीस पथकाने कंटेनरचा शोध घेतला. त्यावेळी कंटेनर हा दुबई येथुन न्हावाशेवा पोर्ट येथे आयात केला असल्याचे व नवकार लॉजीस्टीक येथे उतरविण्यात आल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. कंटेनरमधील आयात केलेल्या मार्बल्स घेवून जाण्यास कोणीही दावा न केल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे कंटेनरची पंचासमक्ष पाहणी करण्यात आली. त्यावेळी मार्बल्स पुर्णपणे कंटेनरच्या बाहेर काढल्यानंतर कंटेनरच्या दरवाजाला असलेल्या फ्रेमची बारकाईने पाहणी केली असता फ्रेममध्ये अंमलीपदार्थ लपविला असल्याचा संशय आला. पोलिसांनी तातडीने कंटेनरचा दरवाजा व त्यावरील फे्रम कटर मशिनच्या सहाय्याने कापण्यात आला.
दरवाजा कापल्यानंतर त्यामध्ये हेरॉईन नामक अंमलीपदार्थ 72.518 कि.ग्रॅ. वजनाचे व सुमारे 362.59 कोटी रुपये किंमतीचे एकुण 168 पॅकेट्स मिळुन आले. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ (हेरॉईन) संगनमत करून अवैधरित्या भारतात आयात करणारे, निर्यात करणारे, प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या मदत करणार्या इसांमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, अपर पोलीस महासंचालक (का.व.सु) कुलवंतकुमार सरंगल, पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, एएचटीयु गुन्हे शाखा शैलेश पासलवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीर अली सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सपोनि संदिप गायकवाड, सपोनि विजय चव्हाण, सपोनि राणी काळे, पो.उप.नि. विजय शिंगे व गुन्हे शाखा नवी मुंबईचे अंमलदार तसेच रविंद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंकुश खेडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि तुकाराम कोरडे, सपोनि अविनाश पाळदे, सपोनि श्रीमती धनश्री पवार, पनवेल तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई व कोमलप्रीत सिंह पोलीस उप निरीक्षक, एस. एस. ओ. सी. मोहाली, पंजाब यांनी यशस्वीपणे पार पाडली.