हेटवणे धरण ओव्हरफ्लो; नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्‍न सुटला

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातून नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा करणारे हेटवणेे धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. या धरणाची एकूण क्षमता 147 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मागील काही दिवसांपासून पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात जोरदार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाचेे 6 दरवाजे 2 फुटांनी उघडले आहे. त्यातुन 9.44 घनमीटर लिटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहणे गरजेचे आहे. धरणाचे दरवाजे केवळ सावधानता म्हणून उघडण्यात आले असल्याची माहिती हेटवणे धरणाचे कार्यकारी अभियंता एस.बी. जाधव व उपविभागीय अभियंता आकाश ठोंबारे यांनी दिली. या पाश्‍वर्र्भूमीवर पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी खाडी व नदी किनार्‍यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या तरी पूरपरिस्थिती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Exit mobile version