हेटवणे जलवाहिनी फुटली

हजारो लिटर पाणी वाया

| उरण | वार्ताहर |

नवीमुंबई, खारघर व उरण तालुक्यातील रहिवाशांना पाणीपुरवठा करणारी सिडकोची हेटवणे पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी ही उरण तालुक्यातून जात आहे. सदरच्या जलवाहिनीला चिरनेर गावा जवळील पी.पी.खारपाटील यांच्या पेट्रोल पंपा जवळील रस्त्यावरुन भरधाव वेगात जाणाऱ्या अवजड वाहनाने जोरदार धडक देण्याची घटना गुरुवारी (दि.6) घडली. या झालेल्या अपघातात जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे फवारे उंच उंच उडून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून हेटवणे पाणीपुरवठा विभागाने रहिवाशांना करण्यात येत असलेला पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला असून तातडीने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

पेण तालुक्यातील भोगेश्वरी नदीवर बांधण्यात आलेले हेटवणे धरण आहे. सदर हे धरण जलसंपदा विभागाचे आहे. मात्र 1998 मध्ये सिडकोने या धरणाच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य केले आहे. त्यामुळे सिडकोच्या माध्यमातून नवीमुंबई, खारघर व उरण तालुक्यातील रहिवाशांची तहाण भागविण्यासाठी हेटवणे धरणातील जलाशयाचा वापर हा हेटवणे पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सिडकोच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी वारंवार फुटण्याच्या घटनेत वाढ होत आहे. पाणीपुरवठा विभागाने घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याची माहिती हेटवणे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सचिन बोरसे यांनी दिली आहे.

Exit mobile version