। रायगड । वार्ताहर ।
महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने स्वत:चा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हजारो मतदार आपल्या गावी जात आहेत. मात्र, या संधीचा अनुचित लाभ उठवत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अव्वाच्या-सव्वा प्रवास भाडे आकारून मतदारांची अक्षरश: लुटमार चालू केली आहे. मतदार हे आपल्या क्षेत्रात जाऊन मतदान करू नये म्हणून खासगी ट्रॅव्हल्सवाले एकप्रकारे खोडा घालत आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात अनेक नागरिकांनी तक्रार करून आम्हाला कळवले आहे. तरी निवडणूक आयोगाने खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून मतदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी केली आहे.
सुराज्य अभियानाच्या वतीने आवश्यक ते पुराव्यासह देऊन कठोर कारवाई मागणी एका निवेदनाद्वारे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. दिवाळीनंतर 500-700 रुपये असलेले मुंबई-कोल्हापूर मार्गावरील तिकिटांचे दर 19 आणि 20 नोव्हेंबरसाठी जवळपास दुपटीने 1 हजार ते 1 हजार 600 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. विशेषतः ऑनलाईन तिकिट प्लॅटफॉर्मवरही अशीच भरमसाठ लुटमार चालू आहे. केवळ मुंबई-कोल्हापूर, रत्नागिरी, संभाजीनगर या ठिकाणीच नव्हे, अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवासभाडे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. या भाडेवाढीमुळे मतदारांना त्यांच्या मूळ गावी जाऊन मतदान करण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे, असेही मुरुकुटे यांनी सांगितले आहे.