ग्राहकसेवेसह वीजबिल वसुलीला सर्वोच्च प्राधान्य

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रतिपादन
मुंबई | प्रतिनिधी |
महावितरण कंपनी सुद्धा मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी चालू वीजबिलांसह थकबाकी वसुली करणे आवश्यक आहे. त्याबाबत वीजग्राहकांना महावितरणची आर्थिक परिस्थिती समजून सांगावी. सुरळीत वीजपुरवठा व अचूक वीजबिलांसह ग्राहकसेवेला सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तक्रारींचे निवारण योग्य वेळेत झालेच पाहिजे याकडे वरिष्ठांनी विशेष लक्ष द्यावे असे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत.
महावितरणच्या ‘प्रकाशगड’ या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, संचालक (वित्त) श्री. रवींद्र सावंत, एमएसईबी होल्डींग कंपनीचे सल्लागार श्री. उत्तमराव झाल्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सद्यस्थितीत सुरु असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी तसेच वीजदेयक व महसूल, वीजहानी, एएमआर मीटर, येत्या कालावधीतील सणासुदीचे दिवस व रब्बी हंगामामध्ये वीजपुरवठ्याचे नियोजन आदींचा आढावा घेण्यात आला.
ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. विजेची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच ग्राहकसेवेसाठी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच शासनाकडून राबविण्यात येणार्‍या विविध योजनांच्या अंमलबजावणीला आणखी गती देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
या आढावा बैठकीस मुख्यालयातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर महावितरणचे क्षेत्रीय सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

Exit mobile version