पोलीस भरतीसाठी उच्च शिक्षितांच्या रांगा

31 हजारांपैकी अकरा हजार 233 उमेदवार

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड पोलीस दलातील शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया महिन्याभरापासून सुरु आहे. अकरा हजारांहून अधिक उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज आल्याचे छाननीतून समोर आले आहे. पोलीस भरतीसाठी बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. मात्र, इंजिनिअर, वकील, एमबीएस, बी-टेक अशा उच्च शिक्षित तरुणांनादेखील पोलीस व्हायचं आहे. यामुळे वाढत्या बेरोजगारीची समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दरम्यान, उच्च शिक्षित बेरोजगारांना नोकरीची हमी देणाऱ्या सरकारचे यातून अपयश प्रकर्षाने दिसून येत आहे.

रायगड पोलीस दलातील 422 जागांसाठी 31 हजारांहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या भरतीची मैदानी चाचणी महिन्याभरापासून सुरू आहे. पोलीस यंत्रणा या कामात मग्न झाली आहे. पोलीस भरतीसाठी 11 हजार 233 उमेदवार उच्च शिक्षित असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअर 186, बी-टेक 77, एमबीए 4, एमसीए 10, बी फार्मसी 35, एम फार्मसी 2, बीसीए 106, बीबीए 15, एमएसडब्ल्यू 18, बीएसस्सी ग्री 162 व बीएसडब्ल्यू 12, सनदी लेखापाल पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका, तर सहा एलएलबी पदवीधारकांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करून शारीरिक चाचणी दिली असून कला शाखेतील 5 हजार 791 पदवीधर, वाणिज्य शाखेतील 2 हजार 46 आणि विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त झालेल्या 1 हजार 773 उमेदवारांचा समावेश आहे.
शिक्षणानुसार नोकरी मिळत नसल्याने या बेरोजगार उच्च शिक्षित उमेदवारांना पोलीस भरतीसाठी उतरण्याची वेळ सरकारच्या अनास्थेमुळे आली आहे. उच्च शिक्षणानुसार नोकरी सरकारकडून उपलब्ध झाली असती, तर पोलीस भरतीला शिपाई पदासाठी उतरण्याची वेळ आली नसती, अशी संतापजनक प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त होत आहेत.

चाचणी न झालेल्या उमेदवारांना संधी
रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाईसह बॅन्डस्‌‍मन, चालक या 422 पदांसाठी 21 जूनपासून भरती प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये मैदानी चाचणी न झालेल्या पुरुष उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. या उमेदवारांची मैदानी चाचणी सोमवारी (दि.29) सकाळी सहा वाजता जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली येथे होणार आहे. या चाचणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे एकाच दिवशी व लागोपाठच्या दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी किंवा लेखी परीक्षेसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणांमुळे ज्या पुरुष उमेदवारांनी अद्यापपर्यंत मैदानी चाचणी दिली नाही, अशा पुरुष उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
Exit mobile version