पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

वर्दीच्या रांगेत डॉक्टर, इंजिनीअर

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

पोलीस शिपाई होण्यासाठी बारावी उत्तीर्ण ही पात्रता असताना नवी मुंबई पोलीस दलात पोलिस शिपाईपदासाठी राज्यभरातील असंख्य उच्चशिक्षित पदवीधरांनी अर्ज दाखल केले आहेत. यात आयुर्वेदिक डॉक्टर, विविध शाखांचे अभियंते, एमए, एमकॉम, बीएससी, बीए, बी फार्मा झालेल्या असंख्य तरुण-तरुणींचा समावेश असून यात काही पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवारही पोलिस शिपाई होण्यासाठी मैदानी चाचणी देताना दिसून येत आहेत.

नवी मुंबई पोलीस दलातील 204 पोलीस शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी तब्बल 12 हजार 375 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यात बीएएमएस एमडी डॉक्टरसह 40 अभियंते, वकील, एमबीए आदी पाच हजार 645 उच्चशिक्षित उमेदवारांचा समावेश आहे. या पोलिस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेत 24 बीएएमएस, 100 बीई, 21 बीटेक, 263-एमए /एमबीए, 797-बीएस्सी, 1 एलएलबी या उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे आर्म फोर्स ग्रॅज्युएट असलेल्या 50 तरुणांनीही या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. सुरक्षित भविष्याच्या उद्देशाने पोलीस शिपाईपदाच्या भरतीत सहभाग घेतल्याचे या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका उच्चशिक्षित तरुणाने सांगितले.

सुरक्षित भविष्यासाठी
सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सरकारी नोकरी मिळणे खूपच अवघड झाले आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. या भरतीसाठी आलेल्या उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. सुरक्षित नोकरी प्राप्त करून भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याची शक्यता एका उच्चपदस्थ पोलिस अधिकार्‍याने वर्तवली.

उच्चशिक्षित अर्जदारांची संख्या
बीएएमएस (24), एमई (03), बीई (100), बीटेक (21), एमए/एमबीए (263), बी फार्मा (08), बीकॉम (999), एमकॉम (114), एमएस्सी (288), एलएलबी (01), बीएस्सी (797), आर्म फोर्स ग्रॅज्युएट (50), बीएड (03), बीपीएड (03), बीपीएमटी (01), हॉटेल मॅनेजमेंट (06), एम फार्मा (01), एमए (95), बीए (2868), इंटेरियर डिझायनर (01), एचएससी (6773) आणि अन्य पदवीधारक (83)

Exit mobile version