भूसंपादनाच्या भरपाईवरुन महामार्गाचे काम रखडले- आ. जयंत पाटील

| मुंबई | प्रतिनिधी |

भूसंपादनाचे पैसे किती द्यायचे यावरुन अधिकारी आणि संबंधित मालमत्ताधारक यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याचे आ.जयंत पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणले. यावर गुढीपाडव्यापासून पोलीस संरक्षणात या मार्गाचे रखडलेले काम सुरु करु, अशी घोषणा बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत केली.

सभागृहात महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत बोलताना आ.जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अलिबागकडे वळणारा रस्ता वड़खळकडे अडविण्यात आला आहे. तो 100 टक्के शासनाच्या ताब्यात आहे. फक्त तिथे 10 ट्रक माती टाकायची आहे. तसेच पेण येथील रामवाडीजवळ गणेशोत्सवात वाहतूक कोंडी होती. त्या मार्गावर रस्त्याला लागून असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या इमारतीचा वाद सुरु आहे. भूसंपादनाचे पैसे किती द्यायचे यावरुन अधिकार्‍यांमध्ये वाद सुरु आहे. म्हणून तेथील काम थांबले आहे. तो वाद मिटवावा अशी मागणी केली.

यावर बांधकाम मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते कासू मार्गाचे काम रस्त्याचे काम जे. एम. म्हात्रे यांच्याकडे तर कासू ते इंदापुर कल्याण टोल या ठेकेदाराकडे देण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामाची सुरुवात येत्या गुढी पाडव्याला करणार असल्याचे त्यानी जाहीर केले. या मार्गावरील भुसंपादनाचे 1556 लवाद मिटवायचे आहेत. यासाठी सर्व लोकप्रतिनिधीनी सरकारच्या पाठीशी उभे राहने गरजेचे आहे. रस्त्याला लागणारे मटेरियल ठेकेदाराना उपलब्ध करून देण्यासाठी तसेच खाणीच्या परवानग्या देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना आदेश देण्यात आले असल्याचेही त्यानी सांगितले.

या रस्त्याचे रोजच्या कामाचे चित्रीकरण ड्रोन मार्फत करून ते राष्ट्रीय महामार्गच्या वेबसाइडवर ठेकेदाराने टाकणे बंधनकारक केले आहे. लोकांच्या भूसंपादनाचे पैसे सरकारकडे जमा असून लोकांनी आपापसातील मतभेद मिटवून ते घ्यायचे आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Exit mobile version