| श्रीवर्धन | मिलिंद जाधव |
चारशे वर्षांपूर्वीचा चौफेर मोगली आक्रमणाचा भयानक दहशतीचा तो काळ. मुळा-मुठा नद्यांच्या पाण्यावर दहशतीची काळी छाया पसरली होती. या नद्यांच्या तीरावर वसलेल्या पुणे या त्यावेळच्या छोट्याशा गावातली रयत अमिन खानाच्या दहशतीला घाबरून जीव मुठीत घेऊन परागंदा झाली होती. बेचिराख केलेल्या पुण्यात इथे येणाऱ्याचा निर्वंश होईल अशी दहशत पसरवून एक पहार रोवली गेली. ही पहार रोवली होती चिमुरड्यांच्या निरागसतेवर, मंदिरातल्या आरती-पारायणांवर, लेकीबाळींच्या इज्जतीवर. पर्यायाने ही पहार रोवली होती भविष्यातल्या हिंदवी स्वराज्याच्या सोनेरी स्वप्नांवर. एवढ्या भयानक दहशतीत या गावचं गावपण प्रस्थापित करून रयतेला गावात यायला प्रोत्साहित करुन त्यांचा ढासळलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यासाठी कुणीतरी हे जीवघेणं धाडस करणंसुद्धा तेवढच गरजेचं होतं.
याच वेळेला हिंदवी स्वराज्याचं सोनेरी स्वप्न पाहिलेले शहाजीराजे आणि कर्तबगार लखुजी जाधवांची लेक वीरमाता जिजाऊंची पावलं बाल शिवबाला घेऊन पुण्याची बिकट वाट चालू लागली. वाट बिकट असली तरी निर्धार ठाम होता. राजमाता असल्या तरी त्यांच्या येण्याची ना कुणी वर्दी द्यायला होतं, ना कुणी स्वागताला होतं. गुटगुटीत बाळाच्या गालावरच्या खळीसारख्या गावाची अवस्था मोगली कोल्ह्याकुत्र्यांच्या दहशतीने मसणवट्यापेक्षा भयानक झाली होती. हे सर्व याची डोळा याची देहा अनुभवलेल्या जिजाऊंनी हे भयानक आव्हान स्वीकारलं.
गाढवाने नांगरलेल्या जमिनीत दिवा लावणाऱ्याचा वंश वाढत नाही अशी समजूत असणाऱ्या त्या काळात रोवलेली पहार उपटून फेकून देत बाल शिवबांच्या हातून दिवा लावून त्यांनी पुण्याच्या जमिनीची मशागत केली. गाव सोडून गेलेल्या रयतेला आवाहन करून पुण्यात बोलवलं. खरं तर, दहशतीचा धसका घेतलेल्या रयतेचं गावात येणं सहजासहजी शक्य नव्हतं. पण, शिवबांनी प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या सात्विक प्रकाशात रयतेला भविष्यातलं सोनेरी स्वप्न दिसू लागलं.
रानावनात दडून राहिलेली रयत दबक्या पावलाने का होईना गावाकडे परतू लागली. जिजाऊंनी त्यांना अवजारं, बी बियाणांचा पुरवठा करून शेतीसाठी प्रोत्साहित केलं. हळूहळू पुण्यातली शेत-शिवारं हिंदवी स्वराज्याच्या चाहुलीने वाऱ्याच्या तालावर डोलू लागली. राजनीती आणि शस्त्रास्त्र पारंगत असलेल्या जिजाऊंनी अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा शिवबांच्या मनात खोलवर रुजवली. याच बळावर मूठभर मावळ्यांच्या साथीने रायरेश्वराच्या साक्षीने बालशिवबांनी हिंदवी स्वराज्याचा बेलभंडारा सह्याद्रीच्या आसमंतात उधळला आणि अठरापगड जातीची वज्रमूठ मावळा या एकाच नावाने गनिमाच्या गोटात भूकंप घडवू लागली.
1657 साली हिंदवी स्वराज्याच्या दुधात शंभूबाळाच्या जन्माने साखर पडली. मात्र, काही दिवसातच मातृछत्र हरपल्यामुळे शंभूबाळाची जबाबदारीसुद्धा जिजाऊसाहेबांवर येऊन पडली. जिजाऊंच्या मांडीवर संस्कारित होणाऱ्या शंभूराजांच्या हातून वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी चार ग्रंथांच्या रूपाने साक्षात सरस्वती अवतरली. अलौकिक बुद्धिमत्ता आणि शस्त्रास्त्र पारंगत झालेले शंभूराजे शिवाजी महाराजांबरोबर मोहिमेवर जाऊ लागले. स्वराज्याचा अश्वमेघ खऱ्या अर्थाने चौफेर उधळू लागला. वर्धिष्णू होत असलेलं स्वराज्य पाहून स्वराज्यजननी जिजाऊ कमालीच्या सुखावल्या. पुढे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असल्याचं समजताच आदिलशहा कोकण आणि घाटमाथ्याच्या हद्दीवर असलेला रांगणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी आला. मात्र, वीरमाता जिजाऊंनी स्वतः या मोहिमेचं नेतृत्व करून आदिलशहा आणि त्याच्या फौजेला पाणी पाजलं.
असंख्य मावळ्यांच्या असीम त्यागाने आणि पराकोटीच्या निष्ठेने कित्येक गडकोटांचं मंगल तोरण हिंदवी स्वराज्य अभिमानाने मिरवू लागलं. यामागे प्रेरणा होती वीरमाता जिजाऊंची. हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत एक नव्हे, दोन नव्हे तर, तीन-तीन छत्रपतींचं दान टाकणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव गुरु, धैर्य आणि शौर्याची तळपती तलवार, मध्ययुगीन दुर्गा वीरमाता जिजाऊंच्या चरणी नवरात्रीची पहिली माळ कृतज्ञतापूर्वक अर्पण.
हिंदवी स्वराज्यदुर्गा वीरमाता जिजाऊ
