हिराकोट तलावाला नवा साज

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या हिराकोट तलाव पर्यटक, स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. पण तलावाच्या संरक्षण भिंतीची पडझड होत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी अलिबाग नगरपालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हिराकोट तलावाच्या संरक्षण भिंतीला ठिकठिकाणी पडलेल्या भगदाडामुळे ऐतिहासिक तलावाचे सौंदर्य लोप पावत होते. कान्होजी आंग्रे यांनी हिराकोट किल्ला बांधताना काढलेल्या दगडातून या तलावाची निर्मिती केली होती. त्यामुळे या तलावाला आगळेवेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र, या तलावाच्या संरक्षण भिंतीला अनेक ठिकाणी भगदाड पडलेले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून डागडुजी सुरू केल्याची माहिती अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी दिली आहे.

Exit mobile version