मासे मृत होत असल्याने केली चिंता व्यक्त, मुख्याधिकाऱ्यांना दिले पत्र
| अलिबाग | वार्ताहर |
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या हिराकोट तलावातील माशांचे संवर्धन केले जाणार आहे. माशांना बाहेरून देण्यात येणारे खाद्य पुर्णपणे थांबविण्यात यावे, अशा सुचना मस्त्य विभागाने अलिबाग नगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत.
मत्स्यव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त संजय पाटील यांनी अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना याबाबतचे पत्र दिले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकाऱ्यांनी हिराकोट तलावाची पाहणी केली असता सदर पाहणी दरम्यान तळ्यातील पाण्याचे विविध गुणधर्म तपासण्यात आले. तसेच मेलेल्या तिलापिया माश्याचे नमुने घेण्यात आले. पाण्याचा रंग हा हिरवा झालेला असून पाण्यामध्ये वनस्पतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याने पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण कमी झाले आहे. मृत झालेल्या तिलापिया माश्यांना आजार झाल्याचे दिसून आले आहे. तसेच माशांच्या कल्ल्यांचे निरीक्षण केले असता पाण्यामध्ये कमी प्रमाणामध्ये विरघळलेला प्राणवायू असल्याचे जाणवत आहे, अशी परिस्थिती पाहता पाण्यामधील प्राणवायूची मागणी कमी करण्यासाठी पाण्यामध्ये असलेलाा मत्स्यसाठा 50% कमी करणे आवश्यक आहे. जेणेकरून सद्यस्थितीत पाण्यात असलेला प्राणवायू उर्वरीत माशांना पुरेसा ठरून माशांचे मृत्यू होण्याचे प्रमाण थांबेल, असा दावाही या पत्रातून करण्यात आला आहे. मृत्यूमुखी पडलेले मासे तात्काळ काढून टाकण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळाची तरतूद करावी. जेणेकरून त्यांच्या कुजण्याच्या क्रियेमुळे तलावातील पाणी दर्जाहीन होणार नाही व इतर माशांना होणारा संसर्ग कमी करता येईल. काही नागरिक घरातील शोभेच्या माशांच्या टाक्यांमधील मासे तलावात सोडत असावेत, त्याला देखील अटकाव करावा, असेही मत्स्य विभागाच्या पत्रात नमूद केले आहे.
