हिरानंदानी सर्कल होणार खड्डेमुक्त

| पनवेल | वार्ताहर |

खारघर वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या हिरानंदानी सर्कल मधील चारही बाजूच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्यामुळे खारघरमधील रहिवाशांची खड्ड्यांतून सुटका होणार आहे. खारघर वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या हिरानंदानी पुलाखालून पनवेल येथून सीबीडी बेलापूर येथे, सीबीडी-बेलापूरकडून पनवेल आणि खारघर वसाहतीतून बाहेर आणि खारघर वसाहतीत प्रवेश करणाऱ्या एच आकार असलेल्या चारही बाजूच्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर नियमितपणे खड्डे पडत असतात. विशेष म्हणजे पावसाळ्यात हिरानंदानी सर्कल येथे मोठ्या प्रमाणात खड्डे होतात. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी असतो. त्यात चोहींकडून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते.

वाहतूक कोंडी होवू आणि अपघात होवू नये म्हणून अनेक वेळा खारघर वाहतूक पोलिसांनी हिरानंदानी सर्कल येथील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत केली आहे.दरम्यान, हिरानंदानी सर्कल आणि खारघर वसाहतीच्या प्रवेशद्वारावरील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करुन कायमचे रस्त्यावरील खड्डे दूर करावेत, अशी मागणी खारघरमधील नागरिकांकडून केली जात होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा कोटी रुपये खर्च करुन खारघर वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या हिरानंदानी सर्कलमधील चारही बाजूच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात आल्यामुळे खारघर मधील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. हिरानंदानी पुलाखालील एच आकार रस्त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार असून, या कामाला जवळपास चार ते पाच महिने लागणार आहेत.

खारघर मधील हिरानंदानी पुलाखालील चारही बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खारघर वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरु असून, नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

संतोष काणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक खारघर वाहतूक शाखा.
Exit mobile version