हुतात्म्यांच्या भेटीसाठी अकरा वर्षीय हिरेन नेरळमध्ये

मुंबई ते नेरळ सायकलवरुन प्रवास

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यासाठी तसेच हुतात्मा भाई कोतवाल यांचे घर राष्ट्रीय स्मारक बनविण्यात यावे यासाठी नेरळ गावातील 11 वर्षीय हिरेन राम हिसालके या बालकाने मुंबई ते नेरळ असा 100 किलोमीटर प्रवास सायकलवरून केला. दरम्यान, अवघ्या चार तास 46 मिनिटांत हा सायकल प्रवास पूर्ण केल्याने त्याचे कौतुक होत आहे.

नेरळ गावातील हिरेन या सायकलपटूने गुरुवारी दोन जानेवारी रोजी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त सायकल फेरी काढली. त्यात माथेरान येथील हुतात्मा भाई कोतवाल यांचे घर राष्ट्रीय स्मारक बनवावे, या मागणीसाठी हिरेनने गुरुवारी सकाळी मुंबई येथून सायकल प्रवास सुरू केला. पाच वाजून 35 मिनिटांनी हिरेनने सायकलवरून प्रवास सुरू केला आणि हुतात्मा चौक येथे येत मुंबईसाठी 105 हुतात्मे देणार्‍या स्तंभाला अभिवादन केले. मुंबई झोपलेली असताना हिरेनने सायकल प्रवास सुरू केला. पुढे हुतात्मा चौकातून शिवडीवरून फ्रीवेने चेंबूर गाठले. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हिरेनची सायकल वाशी पुलावरून वाशी शहरात पोहोचला. तेथून राष्ट्रीय महामार्गावरून कोकण भवन आणि नंतर तेथून कळंबोली सर्कल असा प्रवास सुरू होता. कळंबोलीवरून पनवेल येथून चौक असा प्रवास त्याने सकाळी नऊ वाजता पूर्ण केला. चौक येथून कर्जत रस्त्याने कर्जत आणि नंतर कल्याण रस्त्याने नेरळ असा प्रवास फक्त चार तास 46 मिनिटांत पूर्ण केला.

हिरेनने ही सायकल फेरी पूर्ण केली, त्यावेळी हुतात्मा चौकात नेरळमधील अनेक लोक उपस्थित होते. त्यात अंकुश शेळके, मंगेश म्हसकर, चंदन भडसावळे, संदीप म्हसकर, शाळेच्या मुख्याध्यापिका विनया काकडे, मनोहर हजारे, सुभाष नाईक, श्रद्धा कराळे, धनंजय थोरवे, परशुराम दरवडा, हेमंत चव्हाण, मिलिंद विरले, संजय घाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नेरळ पोलीस ठाण्याकडून सुरक्षा देण्यात आली होती. दरम्यान, हिरेनला या प्रवासात दुचाकीवरून त्याचे काका अ‍ॅड. विपुल हिसालके, वडील राम हिसालके, वैभव हिसालके, प्रकाश धुळे, रोशन धुळे, मंगेश बिराडे, विघ्नेश हिसालके यांनी साथ दिली.

Exit mobile version