। माणगाव । प्रतिनिधी ।
मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे उडाण 2023 महोत्सवाचे आयोजन माणगाव येथील द.ग. तटकरे कॉलेज येथे बुधवारी (दि.17) आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवात हिरवळ महाविद्यालय महाड यांनी सुयश संपादन केले.
विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण संस्कृती विकसित करण्यासाठी तसेच शिक्षणाकडे सर्वांगीण दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या प्रकारचे कार्यक्रम मुंबई विद्यापीठामार्फत नेहमी आयोजित केले जातात. या महोत्सवात रायगड जिल्ह्यातील 10 महाविद्यालये सहभागी झाले होते. या महोत्सवात हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड व हिरवळ रात्र महाविद्यालयातील डीएलएलइचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या उडाण महोत्सवामध्ये पथ नाट्य, पोस्टर प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, क्रियेटीव्ह रायटिंग, पोवाडा असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामधील पथ नाट्य, पोस्टर प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, क्रियेटीव्ह रायटिंग या प्रकारात महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सध्याच्या काळातील सेव फूड या ज्वलंत विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.
हिरवळ महाविद्यालयामधील तृतीय वर्ष व्यवस्थापन विभागातील साक्षी वर्मा आणि प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान मधील आयशा शेख यांनी निर्णायक झालेल्या पोस्टर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. क्रियेटीव्ह रायटिंग मध्ये प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान मधील अक्सा सय्यद हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. हिरवळ रात्र महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील गुड्डी खुडे हिने क्रियेटीव्ह रायटिंग स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक पटकावले. तर, ईशा पार्टे हिला उत्कृष्ट पोस्टर डिझाइन करण्यासाठी उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य सुदेश कदम यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.