| रायगड | प्रतिनिधी |
नागोठणे ते वरवठणेला जोडणारा अंबा नदीवरील मोघलकालीन ऐतिहासिक पूल अरुंद व कमकुवत झाल्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या पुलावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.
या संदर्भात महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता. पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेड्स आणि सूचना फलकही लावण्यात आले आहेत. या रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांसाठी वरवठणे आंबेघर फाटारिलायन्स चौक नागोठणे हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडूनही यासंदर्भात सकारात्मक अहवाल प्राप्त झाला असून, पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरळीतपणे चालू ठेवता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.







