पुढील पिढीला इतिहासच मार्गदर्शक ठरू शकेल- पुंडलिक पाटील

। कर्जत । वार्ताहर ।
‘आपण लिहीत राहिले पाहिजे. कारण, पुढील पिढीला त्याची माहिती मिळेल. इतिहासच या पिढीला मार्गदर्शक ठरू शकेल. आता या संगणकीय युगात सारे काही सोपे झाले आहे. मात्र, मागच्या पिढीतील माणसांनी कसा संघर्ष केला, त्यांना किती मेहनत करावी लागली, किती खस्ता खाव्या लागल्या, हे आपण लिहिलेल्या अनुभवावरून कळेल. विजय हरिश्‍चंद्रे रेल्वे प्रवासी संघटनेत 20 वर्षे सचिव होते. यावरून त्यांच्या कामाचा आवाका आपल्या लक्षात येईल,’ असे स्पष्ट प्रतिपादन माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील यांनी येथे केले.
सामाजिक कार्यकर्ते विजय हरिश्‍चंद्रे यांच्याविषयी त्यांच्या मित्रांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी लिहिलेले अनुभव सुभाषचंद्र नातू यांनी शब्दांकन करून ‘भूली हुई यादे’ पुस्तक तयार केले. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रॉयल गार्डनमधील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. समारंभाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते गणेश पूजन व दीप प्रज्ज्वलित करून करण्यात आले. याप्रसंगी पुंडलिक पाटील, विजय हरिश्‍चंद्रे व्यासपीठावर उपस्थित होते.
माजी नगरसेवक निलेश हरिश्‍चंद्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी चित्रकार पराग बोरसे, पत्रकार विजय मांडे, ज्योती जाधव, मुद्रक मंदार दगडे, सुभाषचंद्र नातू आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष राजेश लाड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक बेहरे, प्रभाकर करंजकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. विकास चित्ते यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी सुधाकर आंबवणे, प्रसाद पाटील, शिरीष ताम्हाणे, रमेश भागवत, श्याम शिंदाडकर आदींसह शिवसेवक गुप्ता तसेच हरिश्‍चंद्रे कुटुंबीय व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version