विराट कोहलीने रचला इतिहास

| सेंच्युरियन | वृत्तसंस्था |

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावला. त्यामुळे टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. दरम्यान विराट कोहलीने 2023 साली एक असा विक्रम आपल्या नावावर केला आहे, जो 146 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने केला नाही. सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावा करणारा महान खेळाडू सचिन तेंडुलकरही आपल्या कारकिर्दीत असा विक्रम करू शकला नाही.

खरंतर, विराट कोहलीने 2023 सालची शेवटची खेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे झालेल्या कसोटी सामन्यात खेळली होती. या डावात कोहलीने 76 धावा केल्या आणि या धावांसह विराट कोहली 2023 मध्ये 2000 हून अधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यामध्ये तिन्ही प्रकारातील क्रिकेटमधीलधावांचा समावेश आहे. विराट कोहलीने यावर्षी एकूण 2048 धावा केल्या आहेत. 2023 मध्ये 2000 हून अधिक धावा केल्यानंतर, विराट कोहली सात वर्षांत 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. या अगोदर हा विक्रम सहावेळा 2000हून अधिक धावा करणाऱ्या कुमार संगकाराच्या नावावर आहे.विराट कोहलीने 2012 मध्ये पहिल्यांदा 2000 हून अधिक धावा केल्या होत्या.

त्यानंतर 2016 ते 2019 अशी सलग चार वर्षे विराट कोहलीने 2000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. मात्र, 2019 नंतर विराट कोहलीची बॅट शांत झाली आणि त्यानंतर पुढील तीन वर्षे विराट कोहलीच्या बॅटने तशी कामगिरी केली नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो. या काळात विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक झळकले नाही, पण 2022 मध्ये झालेल्या आशिया चषकादरम्यान विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतकाचा दुष्काळ संपवला आणि आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले.त्यानंतर विराट कोहलीची बॅट थांबली नाही आणि 2023 मध्ये कोहलीने आयपीएलपासून विश्वचषकापर्यंत प्रत्येक प्रकारच्या स्पर्धेत धावा केल्या. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतही विराट कोहलीने सर्वाधिक 765 धावा केल्या आणि एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला.

2012 मध्ये 2186 धावा

2014 मध्ये 2286 धावा

2016 मध्ये 2595 धावा

2017 मध्ये 2818 धावा

2018 मध्ये 2735 धावा

2019 मध्ये 2455 धावा

2023 मध्ये 2048 धावा

Exit mobile version