मनमौजी माऊंटेनियर्सने रचला इतिहास ; पाच दिवसात सर केले पाच सुळके

। रसायनी । वार्ताहर ।
चौक, रसायनी, पनवेल विभागातील मनमौजी माऊंटेनीयर्सने पाच दिवसात पाच सुळके सर करून गडप्रेमींना अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे माउंटेनियर्स यांच्यात उत्साह वाढला आहे.
इरशाळगड, तैलबैला डावा, तैलबैला उजवा, कलकराई, वजीर सुळका हे पाच कठीण सुळके रसायनीतील विनयप्रताप हनुमंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसात चढून ही मोहीम पार पाडण्यात आली. यात 10 ट्रेकर्सचा समावेश होता. त्यात विनयप्रताप सिंह, सुजित भगत, हर्षित भावसिर, चेतन फुलमाळी, अक्षय माळी, योगेश थोरात, केतन धोत्रे, अमन मिश्रा फोटोग्राफर, आकाश सहानी आणि गाडी चालक रोहित पाटील या मोहिमेत सामील होते.
खालापूर तालुका व पनवेल तालुका यांच्या हद्दीवरील इरशाळगडाचा सुळका पहिल्या दिवशी सर केला.पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील तैल-बैला किल्याचा डावा इनरवॉल सर करून तिसर्‍या दिवशी तैलबैलाचा उजवा इनरवॉल सर केला. चौथ्या दिवशी कर्जत तालुक्यातील डाक बहीरी येथील कलकराईचा सुळका सर करून रात्रीचा प्रवास करून ठाणे जिल्ह्यातील शहापुर येथील वाशिंद मधील माहुली किल्ल्यावरील वजीर सुळका सर करून महाराष्ट्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. आजपर्यंत महाराष्ट्रात पाच दिवसात पाच सुळके कोणीच सर केले नाहीत, अशी माहिती ट्रेकर्सकडून प्राप्त झाल्याने हा एक इतिहास रचला गेल्याचे बोलले जाते. मनमौजी माऊंटेनर्सच्या टीमने 5 दिवसात 5 सुळके पूर्ण करून एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Exit mobile version