। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मॅकेच्या हारुप पार्क मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार मिताली राजने 61 धावांची खेळी खेळली.
या खेळादरम्यान मितालीने तिच्या कारकिर्दीतील 20,000 धावांचा टप्पा पार केला. तसेच, मिताली राजचे एकदिवसीय सामन्यातील सलग पाचवे अर्धशतक आहे. मितालीने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग चार अर्धशतके केली होती आणि या मालिकेच्या पहिल्या सामन्यातही मितालीने अर्धशतक केले आहे.
भारताने शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट 38 धावांत गमावल्या. यानंतर मितालीने यास्तिका भाटियासह भारताचा डाव सावरला. या सामन्यात मिताली भारतासाठी सर्वोत्तम फलंदाज ठरली. मितालीने 107 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. मितालीच्या खेळाच्या जोरावर भारतीय महिला संघाने 225 धावांचा टप्पा गाठला.