चित्रांतून साकारला शिवकालीन इतिहास

चित्रकार सुरेंद्र मोकल यांचे सर्व स्तरातून कौतुक

| अलिबाग | विषेश प्रतिनिधी |

काही जण शिकून, तर काही उपजत कलाकार असतात. अशा उपजत कलागुण असणार्‍या कलाकारांकडून बर्‍याच वेळा अशी काही कलाकारी घडून जाते, की पहाणार्‍या रसिकांच्या चेहर्‍यावर आश्‍चर्याची भावमुद्रा उमटते. असाच अनुभव नुकताच तालुक्यातील रेवस-पांतवणे येथे आला. शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती सोहळ्यात सुरेंद्र मोकल यांनी आपल्या चित्रकलेतून शिवकालीन इतिहास साकरला होता.


रेवस येथील सुशील भोसले शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करीत असतात. मिरवणूक, सन्मान आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नुकत्याच 10 मार्चला साजर्‍या झालेल्या शिवजयंतीच्या निमित्ताने दत्तपाडा गावचे रहिवासी सुरेंद्र विठ्ठल मोकल यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.


अर्थात, शिवजयंती सोहळा असल्याने श्री. मोकल यांनी साकारलेल्या शिवकालीन इतिहासावर आधारित महाराजांची चित्रे या प्रदर्शनात विशेष आकर्षण होती. त्याबरोबर लता मंगेशकर, कपिल देव, माजी पंतप्रधान, जवाहरलाल नेहरू, स्व.श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी, महात्मा गांधी, अभिनेत्री नूतन यांसह इतर चित्रांचादेखील यात समावेश होता. शिवकालीन इतिहास साकारताना स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकाचा आधार घेतल्याची माहिती चित्रकार सुरेंद्र मोकल यांनी दिली.


पेन्सिल-स्केचने काढलेल्या चित्रांत मोकल यांनी जो भाव ओतला आहे, तो पहाणार्‍या प्रत्येकाला संमोहित करीत होता. इतका हुबेहुबपणा, जिवंतपणा त्यांच्या चित्रात पहायला मिळत होता. राष्ट्रवादीसचे अमित नाईक, शिवसेना ठाकरे गटाचे आमिर ठाकूर, शेकापचे सुशील पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सोहळ्याला भेट दिली आणि सुरेंद्र मोकल यांच्या कलेचे कौतुक केले. आज वयाच्या 62 वर्षीसुद्धा ते चित्रकला करीत असतात. विशेष म्हणजे, 40 वर्षांत त्यांनी आपल्या कलेचे दोनदा प्रदर्शन लावले. पहिले मुंबईत आणि दुसरे रेवसमध्ये. त्यांची ही चित्रकला या प्रदर्शनातून सर्वदूर पोहचली आहे.

Exit mobile version