आयसीसीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेनंतर आता आयसीसी क्रमवारीतही बदल झाला आहे. यावेळी विशेष म्हणजे पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला मोठा फटका बसला असून, भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला काहीही न करता दुसऱ्या क्रमांकावर येण्याची संधी मिळाली आहे. तसेच, टी-20 आणि कसोटी क्रिकेटला अलविदा करणारा रोहित शर्मा आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची तयारी करत आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित परत येऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याआधी त्याने त्याच्या तयारीत सुधारणा करण्यासाठी अभिषेक नायरची मदत घेतली आहे. अभिषेक नायर हा तोच व्यक्ती आहे ज्याने सुमारे 14 वर्षांपूर्वी रोहित शर्माला त्याची कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्यास मदत केली होती.
नुकत्याच आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत, भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल पहिल्या क्रमांकावर कायम आहे. गिलचे रेटिंग सध्या 784 आहे. गिलने काही काळापासून एकही एकदिवसीय सामना खेळला नसला तरी, त्यानंतरही त्याच्या खुर्चीला कोणताही धोका नाही. दरम्यान, भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 756 आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. दरम्यान, रोहित शर्मालाही न खेळता फायदा झाला आहे, याचे कारण बाबर आझम आहे. खरं तर बाबर आझम मागील क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता. परंतु, वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बाबर आझमची कामगिरी खूपच खराब होती. त्यानंतर बाबर आझमची सरासरी खाली आली आहे, त्यासोबतच तो क्रमवारीतही खाली आला आहे. बाबर आझमचे रेटिंग आता 751 वर आले आहे.
दरम्यान, रोहित शर्मा 2027चा विश्वचषक खेळणार की नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, त्याची आयसीसी एकदिवसीय सामन्यातील क्रकमावरीतील दुसऱ्या क्रमांकावरची झेप ही रोहित शर्माला ट्रोल करणाऱ्यांच्या चांगलीच चपराक असेल. तसेच, अगामी एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्मा सज्ज झाला असून तो भारतीय संघातील सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर सोबत जिममध्ये सराव करत आहे. याबाबत रोहित शर्माने स्वतः सोशल मिडीयावर अपडेट दिली आहे. रोहित शर्मा आणि अभिषेक शर्मा हे आधी एकत्र खेळले आहेत आणि दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. तसेच, 14 वर्षांपूर्वी देखील नायरने रोहित शर्माला प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे रोहित शर्माच्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र होत आहे.
रोहितचे धमाकेदार पुनरागमन
काही दिवसांपूर्वीच युनायटेड किंग्डममधील सुट्टीवरून परतणाऱ्या रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर लोकांनी रोहितला लठ्ठपणाबद्दल जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली. परंतु, आता रोहित शर्माने स्वतः इंस्टाग्रामवर स्टोरी अपडेट केली आहे, ज्यामध्ये तो अभिषेक नायरसोबत जिममध्ये सराव करताना दिसत आहे. यावरून तो त्याच्या फिटनेसबद्दल आणि मैदानात परतण्याबद्दल गंभीर झाला आहे हे दिसून येते. तसचे, 14 वर्षांपूर्वीही अभिषेक नायरने रोहित शर्माला प्रशिक्षण दिले होते. जेव्हा 2011 च्या विश्वचषक संघात रोहितची निवड झाली नव्हती. त्या काळात अभिषेक नायरने रोहितला त्याची फिटनेस आणि कौशल्य सुधारण्यास खूप मदत केली होती.







