होर्डिंगची होणार पडताळणी; नगरपालिका प्रशासनासह अन्य यंत्रणा लागली कामाला
। अलिबाग । प्रतिनिधी ।
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा प्रशासनानेदेखील अशा होर्डिंगची धास्ती घेतली आहे. जिल्ह्यातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यापासून धोकादायक होर्डिंग्ज काढण्यासाठी नगरपालिकेपासून वेगवेगळी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
![](http://krushival.in/grygrars/2024/05/IMG_20240515_145113-e1715780518342-1024x456.jpg)
वादळी अवकाळी पावसामुळे घाटकोपर येथील एक लोखंडी होर्डिंग्ज पेट्रोल पंपावर कोसळले. त्यामध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर शासन खडबडून जागे झाले. जिल्ह्यातील यंत्रणादेखील अॅक्शन मोडवर आली आहे. एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित आठ एसटी बस आगार आहेत. या आगारांमध्ये सुमारे 20 हून अधिक होर्डिंग्ज असून, नगरपालिका, ग्रामपंचायत व महानगर पालिका क्षेत्रामध्ये सुमारे 30 हून अधिक होर्डिंग्ज असल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये महामार्गासह वेगवेगळ्या ठिकाणी शहरी भागात, एसटी बसस्थानकाच्या आवारात मोठ मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. अलिबाग-रोहा, अलिबाग-पनवेल, अलिबाग-मुरूड, अलिबाग-रेवस, मांडवा मार्गावर ठिकठिकाणी असलेल्या होर्डिंग्जची पाहणी करण्याचे काम वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत सुरु करण्यात आले आहे. त्याची पडताळणी सुरु केली आहे. गंज लागलेले, जीर्ण झालेले होर्डिंग्ज काढण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
स्थानकातील होर्डिंग्ज धोकादायक अलिबाग एसटी स्थानकात ठिकठिकाणी मोठ मोठे जाहिरातींचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. स्थानकाच्या आवरातील एक होर्डिंग्ज जीर्ण झाले आहे. ते वादळी पावसात पडण्याची भीती आहे. मात्र, एसटी महामंडळाकडून ते काढण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. घाटकोपर येथील दुर्घटनेकडून बोध घेऊन तरी स्थानकातील होर्डिंग्ज काढतील का, असा सवाल प्रवासी मित्रवर्गांकडून उपस्थित केला जात आहे.
कारवाई होणार जिल्ह्यातील स्थानकांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे अंदाजे वीस होर्डिंग्ज आहेत. होर्डिंग्ज बसविण्यापासून त्याला परवानगी देण्यासाठी स्वतंत्र यंंत्रणा आहे. एजन्सी नेमण्यात आली आहे. होर्डिंग्ज खराब असल्यास त्यावर कारवाईच्या करण्याच्या सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळ रायगड विभाग नियंत्रणक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अलिबाग शहरामध्ये बसस्थानकातच एक मोठे होर्डिंग्ज असून, ते खराब झाले आहे. ही बाब आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ते काढण्याच्या सूचनादेखील केल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्याकडून कार्यवाही झालेली नाही.
अंगाई साळुंखे,
मुख्याधिकारी तथा प्रशासक,
अलिबाग न.पं.