घंटागाडी कामगारांना सुट्ट्यांचा मोबदला!

पगारी सुट्टीत काम करणार्‍यांना मिळणार पैसे

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिकेमध्ये कचरा संकलन करणारे घंटागाडी नियमानुसार 21 सुट्ट्या मिळणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना त्याचा मोबदला देणे नियमानुसार बंधनकारक आहे. परंतु, 2023 चे 2024 या कालावधीमध्ये काम करूनही संबंधितांना पैसे मिळाले नव्हते या संदर्भात आझाद कामगार संघटनेने पाठपुरावा करून उपोषणाचा इशारा दिला. त्यानुसार महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला आदेश दिले आहेत. लवकरच घंटागाडी विषय स्वच्छता दुतांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्र हे 110 किमीचे आहे. या ठिकाणी  घनकचरा संकलित करून तो डम्पिंग ग्राउंड वर नेण्याचे काम घंटागाडी कामगार करतात. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून हे स्वच्छता दूत कर्तव्य पार पडतात. ऊन, वारा, पावसामध्ये घंटागाडीसेवा सुरू ठेवली जाते. कारण ती अत्यावश्यक असल्याने कोणतेही कारण पुढे देता येत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असणार्‍या घंटागाडी कामगारांनी कोरोना वैश्‍विक संकटातही पनवेलचा कचरा उचलला होता. साडेपाचशे कामगार या ठिकाणी काम करतात. अविरतपणे कचरा उचलून घोट येथील डम्पिंग डम्प केला जातो. नियमानुसार संबंधित कामगारांना वर्षातून 21 दिवस पगारी सुट्ट्या देणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या चौदा महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक घंटागाडी कामगारांना सुट्ट्याच्या दिवशी काम करावे लागले. मात्र, त्या बदल्यात त्यांना सुट्ट्यांचे पैसे देण्यात आले नाहीत. यासंदर्भात आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. या व इतर मागण्यांसाठी त्यांनी आमरण उपोषणाचाही इशारा दिला होता. परंतु, प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानुसार घंटागाडी कामगारांना मागील सुट्ट्यांचा पगार दिला जाणार आहे. या संदर्भात उपायुक्त वैभव विधाते यांनी संबंधित एजन्सीला आदेश दिले आहेत.

 थकबाकी मिळणार!
पगारी रजा असतानाही त्या दिवशी कामावर आलेल्या घंटागाडी कामगारांना आता संबंधित ठेकेदाराकडून काम केलेल्या दिवसांचे पैसे मिळणार आहेत.14 महिन्यांचा विचार करता पगारी सुट्टीचे जवळपास 20 हजार रुपये थकीत कामगारांना मिळणार आहेत.
गणवेश आणि चप्पल ही मिळणार!
आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी घंटागाडी विषयक कामगारांना गणवेश आणि चप्पल देण्याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार प्रत्येक कामगारांचे माप घेऊन त्यांना दोन गणवेश दिले जाणार आहेत. त्याचबरोबर चप्पल जोड सुद्धा काही दिवसात देण्यात येणार आहे.

घंटागाडी कामगारांना अतिशय परिश्रम घ्यावे लागतात.  कचरा संकलन करून तो डम्पिंग ग्राउंड वर येण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते, नियमानुसार त्यांना पगारी सुट्ट्या देणे आवश्यक आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही कामगारांना सुट्ट्या मिळाल्या नाहीत. त्या बदल्यात त्यांना पैसे द्यावेत अशी आम्ही मागणी केली होती. ही महापालिकेने मान्य करून त्याप्रमाणे आदेश सुद्धा दिले आहेत. लवकरच कामगारांना चप्पल आणि गणवेश मिळणार आहेत. आझाद कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले याचे समाधान आहे.

महादेव वाघमारे
अध्यक्ष
आझाद कामगार संघटना

Exit mobile version