विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत महापालिका आयुक्तांचा शाळांना आदेश
25 लाखांचा जनसमुदाय जमण्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
। पनवेल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर येथे रविवारी (दि.16) आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार असल्यामुळे या अभूतपूर्व सोहळ्यानिमित्त तब्बल 25 लाखांचा जनसमुदाय जमणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमधील 1900 विद्यार्थी, 50 जिल्हा परिषद शाळांतील व खासगी 100 शाळांमधील सुमारे 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शनिवारी (दि.15) सुट्टी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी पनवेल, खारघरच्या दिशेने मोठ्या संख्येने श्री सदस्य येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासूनच पनवेल, खारघर परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचा आढावा घेण्यासाठी नेतेमंडळींचे वारंवार दौरेही सुरूच आहेत. यासह सिडको, महापालिका, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन दल, आरटीओ यासह विविध प्रशासकीय यंत्रणा खारघरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. या अनुषंगाने शाळेत येता-जाताना विद्यार्थ्यांना अडथळा येऊ नये, या अनुषंगाने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमासाठी श्री सदस्यांच्या वाहनांच्या रांगाच रांगा लागणार असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्नशील तर आहेच मात्र पनवेल महानगरपालिका देखील याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेत आहेत. या कार्यक्रमाला येणार्या श्री सदस्यांना राहण्यासाठी खारघरमधील 30 शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महापालिका हद्दीतील 10 शाळांमधील शिक्षकांवर ही जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारीवर्ग यासह संपूर्ण पनवेल महापालिका प्रशासन या पुरस्कार सोहळ्यासाठी पालिका हद्दीत आवश्यक असे उत्तम पद्धतीने नियोजन करीत आहे.