इर्शाळवाडीकरांचा गृहप्रवेश लांबणीवर

| अलिबाग | प्रतिनिधी |

सहा महिन्यात नवीन पक्की घरे देण्याचे आश्वासन इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना राज्य सरकारने दिले होते, मात्र दुसरा पावसाळा आला तरी घरे बांधून झालेली नाहीत. सध्या त्यांचे वास्तव्य पत्र्याच्या कंटेनरमध्ये आहे. अंगाची लाहीलाही होणाऱ्या उष्म्यामुळे त्यांचा जीव होरपळून निघत आहे. निसर्गाचा प्रकोप पाठ सोडत नाही आणि सरकारही आधार देत नाही, अशी अवस्था दरडग्रस्तांची झाली आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेला जवळपास 10 महिने झाले आहेत. सरकारकडून कडून पुनर्वसन करण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या नवीन घरांची सद्यःस्थिती पाहता, गृहप्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

खालापूर तालुक्यात अत्यंत दुर्गम-डोंगराळ भागात वसलेल्या 44 घरांच्या इर्शाळवाडीवर 19 जुलै महाकाय दरड कोसळली होती. यात 84 जणांना आपला जीव गमवावा लागला. या नैसर्गिक आपत्तीतून जे बचावले त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात चौक येथे पत्र्याच्या कंटेनरमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. दुर्घटना घडल्यानंतर केंद्र, राज्य सरकारसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी दरडग्रस्तांना मदत केली. निसर्गाच्या कुशीत राहणारे दरडग्रस्त सध्या पत्र्याच्या कंटेनरमध्ये वास्तव्यास आहेत. ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात होती, मात्र दहा महिने उलटूनही पक्की घरे न मिळाल्याने, त्यांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.

कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी मानिवली गावात सरकारने अडीच हेक्टर जमीन संपादित करून सिडकोच्या अधिपत्याखाली काम सुरू केले आहे, त्यामुळे सहा हक्काची घरे मिळतील, अशी आशा दरडग्रस्तांमध्ये होती. प्रत्यक्षात काम संथगतीने सुरू असून आतापर्यंत जेमतेम 35 घरांचे स्ट्रक्चर उभे राहिले आहे. 25 घरांचे वीट बांधकाम व प्लास्टरचे काम झाले आहे तर उर्वरित घरांचा पायाही रचला गेलेला नाही. दहा महिन्यांपासून 43 दरडग्रस्त कुटुंबे पत्र्याच्या कंटेनरमध्ये राहत आहेत. याठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध नाहीत, जे पाणी मिळते त्याला दुर्गंधी येत आहे. उन्हामुळे कंटेनर तापतात, त्यामुळे या घरांमध्ये राहणे असह्य होत असल्याने झाडाचा आधार घ्यावा लागतो. मात्र याठिकाणी डासांचा प्रादुर्भाव असल्याने दरडग्रस्त हैराण झाले आहेत.

10 जूनपर्यंत गृहप्रवेश होण्याचा प्रशासनाचा दावा
10 जूनपर्यंत सर्व घरांची कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सिडको आणि संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी दिली. तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दरडग्रस्त कुटुंबांना नवीन घरांचे लोकार्पण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सिडकोचे कार्यकारी अभियंता बी. जी. पाटील यांनी सांगितले.
Exit mobile version