भारत-पाकिस्तानचा महामुकाबला
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
हाँगकाँगमध्ये यंदा तब्बल सात वर्षांनंतर हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ खेळणार आहेत. क्रिकेटच्या सर्वसाधारण स्पर्धेपेक्षा ही स्पर्धा वेगळी असून अधिक रंगतदार होणार आहे.
हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट टुर्नामेंट ही स्पर्धा 1 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह यजमान हाँगकाँग, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड यूएई, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि ओमान अशा 12 यंघांचा सहभाग आहे. सर्वसाधारण क्रिकेट संघात 11 खेळाडू असतात. पण, या स्पर्धेतील संघात फक्त 6 खेळाडू असणार आहेत. 5 षटकांचा हा खेळ असून प्रत्येक खेळाडूला फक्त एक षटक टाकायला मिळणार आहे. यामुळे दबावाच्या क्षणी कोणता गोलंदाज गोलंदाजी करणार याचा निर्णय घेणे कर्णधाराला आव्हान असेल. याचबरोबर संघातील सर्व 6 फलंदाज बाद होईपर्यंत संघ खेळणार आहे. यात पाचवा फलंदाज बाद झाल्यानंतर शेवटचा खेळाडू एकटाच फलंदाजी करेल. यावेळी भारताचा पहिला सामना 1 नोव्हेंबरला पाकिस्तानशी भारतीय वेळेनुसार 11:30 वाजता सुरू होणार आहे. भारतीयांना हे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच फॅनकोडच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येणार आहेत.
भारतीय संघः
रॉबिन उथप्पा (कर्णधार), मनोज तिवारी, केदार जाधव, शाहबाज नदीम, स्टुअर्ट बिन्नी, भरत चपली आणि श्रीवत्स गोस्वामी.
पाकीस्तानी संघः
फहीम अश्रफ (कर्णधार), आसिफ अली, शाहाब खान, मुहम्मद अखलाक, दानिश अली, आमेर यामिन, आणि हुसैन तलाक.