| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील नवघर शाळेने गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रमात सहभाग घेऊन उल्लेखनीय कार्य करत उत्तुंग यश मिळवले आहे. या शाळेच्या यशात शाळेतील शिक्षक वृंदाचे योगदान आहे. राजिप शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांसाठी दरवर्षी जिल्हा परिषदेकडून 5 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. यावर्षी या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवघर शाळेच्या शिक्षिका वृषाली गुरव यांची निवड करण्यात आली. तसेच, या शाळेतील शिक्षिका शीतल पाटील या नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार, सुधागड तालुका माजी सभापती नंदू सुतार, गावातील प्रतिष्ठित नागरिक डी.सी. चव्हाण, नितीन सुतार तसेच पालक वर्गाच्यावतीने अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.







