पाच हजार वैयक्तिक नळ कनेक्शनचा इष्टांक, अकरा हजार नळ कनेक्शन दिले
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ; सतराशे वैयक्तिक शौचालयाचा इष्टांक पूर्ण
चौक | वार्ताहर |
खालापूर पंचायत समितीने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामासाठी जिल्हा स्तरावर सर्वोत्कृष्ट क्रमांक पटकावला असल्याने गटविकास अधिकारी व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन होत आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागामार्फत जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात येत असते. यात उत्कृष्ट काम करणार्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सहभागाचे, दिलेल्या इष्टांक याचे मूल्यमापन शासनाच्या वतीने करण्यात येते. यामध्ये चांगले काम करणार्या पंचायत समितीला पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये व त्यांच्या सहकार्यांनी दिलेले इष्टांक पूर्ण केल्याने त्यांना गौरविण्यात आले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ज्या महसूल गावात नळ पाणी पुरवठा योजना आहे, तेथे पाच हजार वैयक्तिक नळ कनेक्शन देण्याचा इष्टांक होता. खालापूर पंचायत समितीने अकरा हजार नळ कनेक्शन दिले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सतराशे वैयक्तिक शौचालयाचा इष्टांक पूर्ण केला. तर, महा आवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास 491 पैकी 470, रमाई आवास 139 पैकी 120, शबरी आवास 99 पैकी 97 व आदिम आवास 89 पैकी 81 घरकुले बांधून लाभार्थ्यांना वाटप केली. यात राहिलेली घरे कोरोना, स्थलांतर मुळे पूर्ण झाली नाहीत,पण ती प्रगतीपथावर आहेत. तालुक्यातील सर्व 44 ग्रामपंचायत यांचे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रस्ताव पूर्ण करून शासनाकडे सादर केले आहेत. येत्या काळात त्या कामांना सुरुवात होणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी विविध योजनांत सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून खालापूर पंचायत समितीचा सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार केला. गटविकास अधिकारी संजय भोये, तत्कालीन सहा. गविअ. भाऊसाहेब पोळ, विस्तार अधिकारी शैलेश तांडेल, एम.जी. शिंदे, संदीप मोगारे, रविकिरण राठोड, सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.