इस्रायलचे वाणिज्य दूत कोबी शोशानी
| रेवदंडा | प्रतिनिधी |
भारतात दोन हजार वर्षांपासून ज्यू धर्मीय राहात आहेत. त्यांची संस्कृती, उत्सव, सण, व्यवसाय यांच्याशी भारतातील नागरिक समरस झाले असून, देशात ज्यू धर्मियांना सन्मानाची वागणूक दिली जाते, असे मत इस्रायल देशाचे वाणिज्य दूत कोबी शोशानी यांनी गुरुवारी (दि.31) व्यक्त केले. रेवदंडामधील ज्यू धर्मियांच्या सिनेगॉगला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
ज्यू धर्मियांच्या चालीरीती, या ठिकाणी वसाहतीत असलेली कुटुंबे, उत्सव, सण, उद्योग, सिनेगॉगबद्दलची माहिती पर्यटनाच्या दृष्टीने व्हावी यासाठी येथील सिनेगॉगच्या प्रवेशद्वारजवळ माहितीचा खजिना एकाच क्लिकवर करून देण्यासाठी स्कॅनर बसवण्यात आला असून, त्याचे उद्घाटन शोशानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाणिज्य दूत यांच्या मुंबई कार्यालयातील मुख्य व्यवस्थापक हामीम तळकर यांनी सांगितले, पुढील काही दिवसांत वाणिज्य दूत इस्रायलमध्ये जाणार आहेत. त्यावेळी ही सर्व माहिती एकत्रित संकलित करणार असल्याचे सांगितले.
येथील सिनेगॉगच्या कार्यकारी मंडळांनी पुष्पगुच्छ देऊन वाणिज्य दूत यांचे स्वागत केले. त्यावेळी स्थानिक ज्यू महिला उपस्थित होत्या. वाणिज्य दूत यांनी सिनेगॉगमध्ये दीप उजळून सर्वांसमवेत प्रार्थना केली, तसेच 1842 मध्ये याची उभारणी केली आहे, याबाबत माहिती घेतली. येथील ज्यू धर्मियांनी पारंपरिक उद्योग टिकवून ठेवले आहेत, याबाबत समाधान व्यक्त केले. आपला समाज संख्येने लहान असल्याने सर्वांनी एकोप्याने व आनंदाने राहावे, असे आवाहन कोबी शोशानी यांनी केले. त्यांचे ज्यू समाजाकडून यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी इस्त्रायलचे वाणिज्य दूत कोबी शोशानी, प्रशासन अधिकारी हाईम तलकर, पब्लिक डिप्लोमोसी मिसेस हदर सपोर्मस, रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे, रेवदंडा ग्रामस्थांसह इस्त्रायलचे बांधव उपस्थित होते.







