चार महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत
| पेण | प्रतिनिधी |
महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना, लहान बालकांचे संगोपन आणि महिलांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच आता उपासमारीची वेळ आल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात दिसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे या स्वतः रायगडच्या असतानाही जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या चार महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
लहान मुलांना पोषण आहार द्यायचा, गर्भवती महिलांची काळजी घ्यायची, शासनाच्या योजना घराघरात पोहोचवायच्या; परंतु, आमच्या घरातील चूल मात्र विझण्याच्या मार्गावर आहे, अशी हतबल भावना आशाताईंसह अनेक अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली. दरमहा मिळणाऱ्या अल्प मानधनावरच अनेक सेविकांचे संसार अवलंबून आहेत. मात्र, सलग चार महिने मानधन न मिळाल्याने घरभाडे, वीजबिल, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागवताना सेविकांची अक्षरशः दमछाक होत आहे. काहींवर कर्ज काढण्याची वेळ आली असून अनेक महिलांनी उसनवारीवर संसार सुरू ठेवला आहे. एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करत असताना दुसरीकडे महिलांच्याच श्रमाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्यांच्या खांद्यावर बालविकास योजनेची जबाबदारी आहे, त्यांनाच आर्थिक विवंचनेत ढकलले जात असेल तर ही मोठी शोकांतिका आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशाताई यांनी शासनाकडे तातडीने रखडलेले मानधन देण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे. ‘आमच्या संयमाचा अंत पाहू नका’, असा थेट इशारा सेविकांकडून देण्यात आला आहे.
