उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

| पनवेल | वार्ताहर |

मागील सव्वा वर्षापासून परिमंडळ-1 कार्यक्षेत्रात पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी पनवेलमध्ये कायदा सुव्यवस्थेसह जातीय सलोखा राखण्यात मोलाची कामगिरी बजावली. अबालवृधांसह महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना केल्या. यासह पनवेल परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून त्यांनी अल्पावधीतच गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्या. नुकतीच त्यांची नवी मुंबई परिमंडळ-1 च्या पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी दि. 22 जानेवारी रोजी पनवेलमध्ये कच्छी मोहल्ला परिसरात बाईक रॅलीदरम्यान दोन गटात वाद निर्माण होऊन धार्मिक तेढ निर्माण झाल्याची परिस्थिती उद्भवली होती. मात्र, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पोलिस अधिकारी व अंमलदारांनी वेगाने पाऊले उचलून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दक्ष भूमिका घेतल्यामुळे त्यादरम्यान अन्य ठिकाणी घडलेल्या घटनांचे पडसाद पनवेल मध्ये उमटले नाहीत. याबाबत क्रियाशील प्रेस क्लब पनवेलच्यावतीने त्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी सन्मान सोहळ्यासाठी क्रियाशील प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विजय कडू, साहिल रेळेकर, राज भंडारी, वशाल सावंत, चंद्रकांत शिर्के, क्षितिज कडू, असीम शेख, परेश गायकवाड आदींसह क्रियाशील प्रेस क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version