उत्कृष्ट पर्यटन केंद्र चालकांचा सत्कार

। पनवेल । जसपाल सिंग ।
ग्रामीण भागाचा शाश्‍वत आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. राज्यात पर्यटनासाठी येणार्‍यांना येथील संस्कृतीची माहिती व्हावी, तसेच उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे यासाठी अधिकाधिक शेतकर्‍यांनी कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून नोंदणी करून कृषी आणि पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी हातभार लावावा, असे आवाहन पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले.

जागतिक कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि कृषी पर्यटन विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण केंद्र येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणार्‍या आणि उत्कृष्ट कार्य केलेल्या केंद्र चालकांचा आज सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राज्यमंत्री कु.अदिती तटकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. पुरस्कार प्राप्त कृषी पर्यटन केंद्र चालकांचे त्यांनी अभिनंदन केले.

कृषी पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कृषी पर्यटन केंद्र चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्राचे चंदन चंद्रशेखर भडसावळे, सुखदेव शामराव गिरी, आनंदराव गणपत शिंदे, आदित्य प्रभाकर सावे, मोहन जगताप, अभिलाश संतोषकुमार नागला, राजेंद्र सोभागमलजी डागा, रवींद्र भीमराव पाटील, प्रतिभा किरण सानप यांचा समावेश होता. महाराष्ट्रात कृषी पर्यटन संकल्पना रूजवणे, वाढवणे, प्रचार-प्रसार, क्षमता व कौशल्य, धोरणात्मक विकास करणे या विशेष योगदानासाठी बारामती येथील कृषी पर्यटन विकास संस्थेचे संचालक पांडुरंग भगवानराव तावरे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कृषी पर्यटन विकासाशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये पुरस्कार प्राप्त केंद्र संचालकांनी आपले अनुभव कथन केले. तर, या क्षेत्रातील संजय पवार, डॉ.रवी जायभाये, डॉ.साईनाथ हाडुळे, आनंद पेंडारकर, अविनाश जोगदंड, चंदन कस्तुरवार, डॉ.सौरभ कृष्णा, डॉ.प्रशांत कांबळे, पशुसंवर्धन विभागाचे कोकण विभागीय सह आयुक्त, रूतुजा अचलारे सप्रे आदी तज्ज्ञांनी कृषी पर्यटन केंद्र चालकांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version