प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या नवदुर्गांचा सन्मान

। नेरळ । प्रतिनिधी ।

नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट आणि सिल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या महिला विकास केंद्रात रोजगार उपयोगी प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या नवदुर्गांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणार्‍या नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट यांच्या माध्यमातून महिला विकास केंद्र चालवले जाते. नेरळ गावातील मोहाची वाडी येथील आईबाबा निवास येथील महिला विकास केंद्रामध्ये महिलांना रोजगार मिळावा यासाठी वेगवेगळी प्रशिक्षणे दिली जातात. सिल फाऊंडेशनचे सहकार्य लाभत असलेल्या या महिला विकास केंद्रामध्ये शिवण क्लास, ब्युटिशीयन, आरी कलाकुसर अशी प्रशिक्षण कोर्सेस चालविली जातात. हे सर्व कोर्सेस महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी न आकारता अशी प्रशिक्षणे श्री साई ट्रस्ट आणि सिल फाऊंडेशनकडून घेतली जातात. आदिवासी आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम महिला विकास केंद्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, मंगेश म्हसकर, गणेश अय्यर, राधिका घुले, दिलीप घुले आदी उपस्थित होते.

Exit mobile version