स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारांचा सन्मान

दहिवली ग्रामपंचायतीकडून उभारली कोनशिला

| नेरळ | प्रतिनिधी |

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतलेल्या क्रांतिकारकांचा दहिवली ग्रामपंचायतीकडून सन्मान करण्यात आला आहे. या शूरवीरांची आठवण कायम राहावी यासाठी दहिवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतीकडून कोनशिला बनवण्यात आली आहे.

अमृत महोत्सव मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत कर्जत तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीमध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे नियोजन केले होते. म्हणूनच 1942 च्या लढाईमधील क्रांतिवीरांना सहकार्य करणारे, परंतु दुर्लक्षित असणाऱ्या देशभक्तांचा कोनशिला उभारून गौरव करण्यात आला. या क्रांतिवीरांमध्ये आझाद दस्त्याचा जेव्हा बिरदोले येथे जंगलामध्ये वास्तव्य होता, त्यावेळी भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील तसेच त्यांना मदत करण्यासाठी बिरदोले गावातील देशभक्त तरुणांनी त्या सर्वांची राहण्याची व्यवस्था, जेवण, पाणी आदी वस्तू ने-आण करण्यासाठी बैलगाडी, पलायन कापण्यासाठी लागणारे साहित्य या सर्व वस्तू हे पुरवत होते. या गावातील सहा क्रांतिकारक आणि मालेगाव येथील हरिभाऊ भडसावळे अशा सात क्रांतिकारकांची नोंद इतिहासात झाली आहे.
या सर्व क्रातिकारकांची नावे असलेली कोनशिला उभारण्यात आली असून, तिचे अनावरण सरपंच मेघा मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांच्या सूनबाई प्रा. अनुराधा भडसावळे आणि रामचंद्र भवारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि क्रांतिकारक यांचे नातेवाईक उपस्थित होते. दहिवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतीमधील क्रांतिकारकांमध्ये स्व. कान्हु राघो जामघरे, गोमा राघो जामघरे, पदु राघो जामघरे, बुधाजी चांगो कालेकर, बापु चांगो कालेकर, रावजी महादू कालेकर, नागो चिंधु कालेकर आणि हरिभाऊ भडसावळे या क्रांतिकारकांचा सन्मान करण्यात आला आहे.

Exit mobile version