| अलिबाग | वार्ताहर |
महिला सक्षमीकरणासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सर्व जिल्ह्यांतील विविध शाखांद्वारे विशेष कार्यरत महिलांचा सन्मान केला जातो. अलिबाग शाखेतर्फे शनिवारी (दि.27) कार्यक्रमाचे एस.ओ.एस. बालग्राम, सोगाव येथे करण्यात आला. ऐंशी अनाथ मुलांचा संभाळ करणार्या सर्व गृहमातांच्या विशेष कार्याची दखल घेऊन अलिबाग शाखेतर्फे त्यांचा सन्मान संस्थेच्या सभागृहात करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. शाम जोगळेकर यांच्या हस्ते कापडी पर्स, खाऊ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे कार्यवाह सुजय वाजपेयी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी काही गृहमातांनी मनोगत व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रेमळ गृहमातांविषयी आपले अनुभव सांगितले. हा कार्यक्रम अंनिसच्या जिल्हाध्यक्ष निर्मला फुलगावकर, शुभांगी जोगळेकर, नितीन राऊत, सुभाष पानसकर, संध्या कुलकर्णी, संदीप वारजे आणि शाखेचे अन्य कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून पार पडला.