पार्लरमध्ये तरुणाईची गर्दी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कामोठे वसाहतीमधिल हुक्का पार्लरमध्ये घडलेल्या हाणामारीच्या घटनेनंतर बंद झालेले हुक्का पार्लर पुन्हा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण तरुणींची गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कामोठे वसाहतीमधिल वेंकट प्रेसिडंसी हॉटेलच्या टेरेसवर सुरु असलेल्या एका हुक्का पार्लरमध्ये हाणामारीची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झाल्याची बाब या वेळी पुढे आली होती.
कामोठे पोलीस ठाण्यात या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत हाणामारी घडलेल्या हुक्का पार्लरमधील साहित्य जप्तीचे काम पोलिसांनी केले होते. त्याचप्रमाणे हुक्का पार्लर चालवणारा मालक, व्यवस्थापक तसेच दोन ग्राहकांवर देखील पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा धसका घेत वसाहतीत सुरु असलेले इतर हुक्का पार्लर देखील काही दिवसा करता बंद करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. आता मात्र बंद असलेले हे हुक्का पार्लर पुन्हा सुरु झाले असून, वसाहती मधिल सेक्टर 21 मधील टुडे शिवम या भूखंड क्रमांक 13 तसेच सेक्टर 14 मधिल भूखंड क्रमांक 106 वर सुरु असलेल्या हुक्का पार्लर मध्ये हुक्क्याचा धूर सोडण्यासाठी तरुणाई पुन्हा गर्दी करू लागल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी
हुक्का पार्लरच्या नादाने तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याने वसाहती मधिल हुक्का पार्लर कायम स्वरूपी बंद करा अशी मागणी आगरी, कोळी, कराडी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने तसे पत्र पोलीस आयुक्ताना देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.