| रत्नागिरी | प्रतिनिधी।
मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे बुधवारी (दि.20) पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान बालकांचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती कंपनीची इर्टिका कार मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येत होती. बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकून थेट खोल दरीत कोसळली. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच चिपळूण येथील गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसजवळ कार्यरत असलेल्या रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थेची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्वयंसेवक आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही वेळाने पोलीसांनी घटनास्थळी जावून मदतकार्य केले. तसेच खोळंबलेली वाहतूक सुरुळीत करुन महामार्ग मोकळा केला.
या भीषण अपघातात संजय जाधव रा. मार्कंडी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी कामथे सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला. अपघातातील जखमींमध्ये अप्रिन सावंत (44) मुंबई, रीधा मोडक (28) मुंबई, उजेर मुल्ला (9) चिपळूण, रिया मुल्ला (36) चिपळूण आणि आईल मुल्ला (4) चिपळूण यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहन बाहेर काढण्यासाठी आणि बचावकार्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वालोपे येथे भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी
