। माणगाव । सलीम शेख ।
मुंबई-गोवा महामार्गावर तिलोरे गावच्या हद्दीत टेम्पो ट्रँव्हलर व कारमध्ये धडक झाली. या भीषण अपघातात एकजण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.4) मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय घोले (रा.वणवशी, ता. दापोली) आपल्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक एमएच 48 सीबी 3577 याने मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करीत होता. यावेळी माणगाव तालुक्यातील तिलोरे गावचे हददीत आले असता मुंबई बाजूकडून येणार्या वॅगनर कार क्रमांक एमएच 47 एन 3919 वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार चालक सुरेश परब (रा. मालाड, मुंबई) याने टेम्पोला जोरदार धडक दिली.
या अपघातात आरोपी व त्यांच्या कारमध्ये मागे बसलेल्या साधना मेस्त्री यांना लहान मोठ्या दुखापती झाल्या तर बाजूला बसलेले शशिकांत पांडुरंग पांचाळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील अधिक तपास करीत आहेत.