टेम्पो आणि कारचा धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी
। पाली /बेणसे। धम्मशील सावंत ।
पाली-खोपोली राज्य महामार्गावर पेडली गावाच्या हद्दीत सोमवारी (ता. 18) पहाटे 6 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारमधील प्रवासी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून मुंबईच्या दिशेने जात होते. कार पेडली परिसरात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मृत व्यक्ती रोहन साळुंखे (रा. खेड, जि. रत्नागिरी), तर जखमींमध्ये प्रकाश हजारे (रा. शहापूर, ठाणे) आणि अविनाश पडवळ (रा. टिटवाळा). हे दोघेही गंभीर जखमी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक मदत यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. धडक इतकी भीषण होती की जखमी कारमध्येच अडकले होते. त्यांना कटरच्या साहाय्याने कारचे दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले. जखमींवर सध्या एमजीएम हॉस्पिटल (कामोठे, पनवेल) येथे उपचार सुरू आहेत. मृत रोहन साळुंखे यांचे शव जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
पाली-खोपोली राज्य महामार्गावर भीषण अपघात
