| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुका पर्यटन क्षेत्र असून या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक शहरातील समुद्रकिनारी ये-जा करीत असतात. याच पर्यटकांच्या माध्यमातून घोडागाडी, उंट आणि सायकल मालकांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. परंतु, समुद्रकिनाऱ्यावर सँड बाईक आल्याने घोडागाडी व उंट स्वारी चालकांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
नाताळची सुट्टी व थर्टी फर्स्ट यावेळी समुद्रकिनारी हाजोरो पर्यटकांनी मुरूड समुद्रकिनारी हजेरी लावली. परंतु, जास्तीत जास्त पर्यटकांनी घोडागाडीकडे पाठ फिरुन सँडबाईक्स यांच्याकडे आकर्षित होतं होते. त्यामुळे घोडागाडी चालक-मालक निराश होऊ लागले आहेत. तसेच, याकारणावरून घोडागाडी चालक आणि सँड बाईक चालक यांच्यामध्ये तणावपूर्वक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
घोडागाडी मालक योगेश सतविडकर यांनी कृषीवलच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, घोडागाडी व्यवसाय हा वडीलोपार्जित व्यवसाय आहे. या व्यवसायावर आमचा उदार निर्वाह चालत आहे.ऑक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने आमच्या व्यवसायासाठी महत्वाचे महिने आहेत. या महिन्यात चांगला व्यवसाय होत असतो. परंतु, सँडबाईक्स आल्यामुळे तीन वर्षांपासून आमचा घोडागाडीचा व्यवसाय कमी होत चालला असून आता पर्यटकांच्या मागे धावावे लागते. त्यामुळे दिवसातून कमीत कमी दोन फेऱ्या होणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे घोड्यांचा खर्च देखील सुटत नाही. सध्या मुरूड समुद्रकिनारी 10 घोडागाडी चालक-मालक असुन आम्ही एकत्र पणे व्यवसाय करतो. सुरवातीला मोजक्या सँडबाईक याठिकाणी होत्या. तेव्हा आमचा व्यवसाय चांगला व्हावयाचा.परंतु, आता त्यांच्या संख्या वाढु लागल्यामुळे त्याचा परिणाम घोडागाडी व्यवसायावर होऊ लागला आहे. आमचा त्यांना विरोध नाही. परंतु, आमच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही याची दक्ष ता सँडबाईक्स वाल्यांनी घ्यायला पाहिजे. आमची विनंती आहे की, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या निरीक्षकांनी सँडबाईक्सला पायबंदी घालावी. जेणेकरुन त्यांची संख्या आटोक्यात राहिल, अशी प्रतिक्रिया सतविडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.







