घोड्यांसाठी महाआरोग्य शिबीर

पशुसंवर्धन विभागाचा स्तुत्य उपक्रम
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील घोड्यांचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच त्यांना कोणताही संसर्गजन्य रोग होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सतत शिबिराचे आयोजन केले जाते. यावेळी घोडेवाल्यांसाठी परवाना मिळण्याच्या हेतूने घोड्यांचे आरोग्य महत्त्वाचे असते. यासाठी रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात व्हेटरिनरी प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन या संस्थेने सहभाग घेतला.

पशुसंवर्धन विभागाच्या श्रेणी 1 च्या माथेरानमधील दवाखान्यात परवाना पूर्व घोड्यांसाठी शुक्रवार आणि शनिवार महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. येथील पशुधन विकास अधिकारी अमोल कांबळे तसेच व्हेटरिनरी प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनचे डॉ. रोहित गायकवाड, डॉ. राजेंद्र मरगज, डॉ. गुरुप्रसाद महाडिक, डॉ. दिलीप चौधरी आणि डॉ. प्रशांत बिराजदार यांनी येथील घोड्यांची तपासणी केली. दोन दिवस चाललेल्या शिबिरात एकूण 460 घोड्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे हे आवर्जून उपस्थित होते.

हे आरोग्य शिबीर आमच्या घोडेवाल्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. पुढे पावसाळा असल्याने चार महिने आमचे घोडे हे जास्त वेळ तबेल्यात राहणार आहेत. या शिबिरामुळे आमच्या घोड्यांना नवसंजीवनी मिळाल्यासारखे आहे.

– उमेश ढेबे, अश्‍वपालक

घोडे आणि पर्यटक असे समीकरण असल्यामुळे आम्ही शिबिराचे आयोजन केले. सरा, ग्लॅडर असे संसर्गजन्य रोग होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते. यासाठी आम्ही लसीकरणही करतो. त्यामुळे कोणताही संसर्ग न होताच घोड्याचे आयुष्य वाढते व पर्यटकही निर्धास्त घोड्यावर रपेट करू शकतात.

– अमोल कांबळे,
पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1
Exit mobile version