अश्‍वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती

| माथेरान | वार्ताहर |

स्थानिक अश्‍वपाल संघटना आणि मूळवासीय अश्‍वपाल यांनी माथेरानमध्ये पुढील तीन महिने प्रयोगिक तत्त्वावर सुरू होणार्‍या ई-रिक्षामुळे आमचा येथील घोडा व्यवसाय संकटात येऊन आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते, यासंदर्भात लेखी निवेदन आणि सविस्तर चर्चा करण्यासाठी आ. महेंद्र थोरवे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही संघटनेचे अध्यक्ष आणि असंख्य अश्‍वचालक, मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये ब्रिटिशकाळापासून कोणत्याही वाहनांना परवानगी नाही. येथे येणार्‍या पर्यटकांकरिता येथे फिरण्यासाठी माथेरानमध्ये प्रवासाकरिता घोडा व हात रिक्षा हेच मुख्य पर्याय आहेत. माथेरानमध्ये एकूण 460 प्रवासी घोडा आणि 93 हातरिक्षा आहेत. येथील श्रमिक हात रिक्षा संघटनेच्या सचिवांनी या हातरिक्षाच्या अमानवीय प्रथेतून श्रमिकांना मुक्ती मिळावी यासाठी दहा वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने आदेश देत माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करावी असे आदेश दिले. या आदेशानुसार येथे पुढील तीन महिने प्रयोगिक तत्त्वावर ई-रिक्षा धावणार आहे, यामुळे येथील अश्‍वचालक संभ्रमात असून, आपला घोडा व्यवसाय आत्ता बंद होणार की काय? आपल्यावर आत्ता उपासमारीची वेळ येते की काय? आपला रोजगार यामुळे हिरावला जातो की काय ? असे प्रश्‍न त्यांच्या समोर उभे राहात असल्याने या अश्‍वपाल संघटनेने येथे एकत्रित येऊन येथील स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांची त्यांच्या राहत्या निवस्थानी जाऊन भेट घेतली व ई-रिक्षा संदर्भात लेखी निवेदन सादर केले.

यावेळी स्थानिक अश्‍वपाल संघटना अध्यक्ष आशा कदम, मूळवासीय अश्‍वपाल संघटना अध्यक्ष संतोष शिंगाडे आणि त्यांच्याबरोबर येथील असंख्य अश्‍वचालक, मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version