आंबेतमधील हॉस्पिटलचे काम रखडले; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न

प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत निधीच्या प्रतीक्षेत; विद्युत उपकरणांच्या खरेदीसाठी निधीच नाही

। आंबेत । वार्ताहर ।

म्हसळा तालुक्यातील आंबेत या माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या गावातील सुमारे बारा ते चौदा हजार लोकांना आरोग्य सुविधा देणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत पूर्णत्वास आली असून, जवळजवळ 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, विद्युत उपकरणांच्या कामाकरिता पुढील निधी उपलब्ध नसल्याने ते रखडले आहे. सुमारे पाच कोटी निधी खर्च केलेली ही इमारत फक्त दिखाव्याकरिता उभी असल्याचं काहीसं चित्र समोर आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्तगत प्राथमिक आरोग्य, आंबेत, ता. म्हसळा, जि. रायगड येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत सुमारे पाच कोटी निधी संपवून इमारत, वैद्यकीय अधिकारी निवास स्थान, कर्मचारी निवास स्थाने, संपूर्ण क्षेत्राला वॉल कंपाऊंड अशा स्थितीत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

आंबेत हे म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असून, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. अंतुले यांनी या विभागात जनतेच्या आरोग्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. मात्र, कालांतराने या इमारतीची बाजू कमकुवत झाल्याने हे केंद्र पूर्णतः बंद करण्यात आले, याच गोष्टीची भविष्यात पुन्हा अडचण भासू नये याकरिता येथील गावकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत याची मागणी केली. यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा आदिती तटकरे यांनी सन 2018/19 मध्ये या इमारतीकरिता सुमारे पाच कोटी रुपये इतका निधी मंजूर करून घेतला आणि अखेर कित्येक वर्षे ओस पडलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी पाच कोटी मंजूरदेखील करण्यात आले. आज ही इमारत उभीदेखील राहिली. मात्र, एवढा कोट्यवधी निधी खर्च करूनही इमारतीसाठी लागणारा विद्युतपुरवठा आणि याच विद्युत उपकरणांच्या कामाकरिता पुढील निधी उपलब्ध होत नसल्याने ही इमारत आज रुग्णांच्या सेवेअभावी धूळ खात पडली आहे.

आंबेत ते तोराडी या तीस कि.मी. अंतरावरील नागरिकांना व्हाया पांगलोली ते आंबेत करत खामगाव अन्यथा म्हसळा येथे प्राथमिक उपचाराकरिता जावं लागत असून, आर्थिक भारदेखील तितकाच सहन करावा लागतोय. आंबेत खाडीपट्टा विभागांतर्गत आदिवासी समाजदेखील मोठ्या प्रमाणात असून, या समाजाला प्राथमिक आरोग्य केंद्र सेवांना मात्र मुकावे लागत आहे. गर्भवती महिलांनादेखील रुग्णालयात घेऊन जाणे मोठे मुश्किलीचे बनले आहे. कधीकधी उपचाराअभावी अशा नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.

आवश्यक तांत्रिक यंत्र सामुग्री आणि हाताळणारे टेक्निशियन या बाबी त्वरित उपलब्ध करून देणेदेखील गरजेचे आहे. लवकरात लवकर आरोग्यमंत्री आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन ही सेवा सुरू करावी.

नाविद अंतुले, समाजसेवक

प्रा. आरोग्य केंद्राच्या उर्वरित कामाकरिता सुमारे 16 ते 17 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, त्याचे काम लवकरच सुरू होईल. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच येथील नागरिकांना ही सेवा सुरू करण्यात येईल.

डॉ. किरण पाटील, सीईओ, रायगड जि.प.
Exit mobile version