| म्हसळा | प्रतिनिधी |
इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका देशातील हॉटेल व्यावसायिकांना बसल्याने याचा पर्यटनावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. व्यवसायिक सिलिंडर पुरवठा बंद झाल्याने तसेच बुकिंग दुपटीने वाढल्याने हॉटेल व्यवसायिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे. याचा फटका केवळ हॉटेल मालकानांच नाही तर येथील कर्मचाऱ्यांना देखील बसत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. याबाबत म्हसळा तालुक्यातील हॉटेल संघटनेकडून तहसीलदार सचिन खाडे यांना निवेदन देऊन उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी हॉटेल संघटनेचे अध्यक्ष शैलेश पटेल, सचिव दत्तात्रेय लटके, संदिप गव्हाणे, रामदास रिकामे, मुकेश रायकर, नईम दळवी, सचिन गुरव, निलेश मांदाडकर, किशोर बोरकर आणि सर्व हॉटेल मालक, खानावळ मालक उपस्थित होते.







